बालसंगोपनाचे पाच घटक
गर्भधारणेपासून सुरूवातीच्या तीन वर्षापर्यंत बालकाच्या मेंदूची वाढ अगदी झपाट्याने होत असते. या काळात योग्य बालसंगोपनामुळे अल्पकाळ व दीर्घकाळ टिकणारे अनेक फायदे होतात. जसे की बालक हुशार होते, वागण्यातील हिंसकता कमी होते, बालक मोठे झाल्यावर चिंता आणि नैराश्याचे प्रमाण कमी होते, बालकाच्या कार्यक्षमतेतही वाढ होते. बालकाच्या योग्य संगोपनासाठी पुढील पाच घटक अतिशय महत्वाचे असतात. हे सर्व घटक बालकाला मिळाल्यास बालकाचा सर्वांगीण विकास उत्तमरित्या होण्यास मदत होते.
आहार व पोषण
आईच्या गर्भात असल्यापासूनच बालकाचे पोषण हे वाढ व विकासाकरीता महत्वाचे असते. सहा महिन्यांपर्यंत निव्वळ स्तनपान म्हणजे फक्त आणि फक्त आईचेच दूध व सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आईच्या दुधासोबतच योग्य पूरक आहार. पूरक आहाराचे प्रमाण, घनता, वारंवारीता तसेच अन्नाची विविधता हे सर्व घटक अतिशय महत्वाचे असतात. तसेच बालकाच्या भुकेची लक्षणे ओळखून त्वरीत योग्य प्रतिसाद देणे, जबरदस्ती न करता हसत खेळत बालकाला खाऊ घालणे, बालकाच्या जेवणाची वेळ आनंददायी असणे हेही तेवढेच महत्वाचे असते.
स्वच्छता व आरोग्य
बालकाच्या उत्तम शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यसुद्धा महत्वाचे असते. बालकाचे विविध आजारांपासून संरक्षण करणे, वेळेवर लसीकरण करणे, आजार झाल्यास लवकरात लवकर उपचार उपलब्ध करणे आणि निरोगी राहण्यास चांगल्या सवयी आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असते.
संवेदनशील पालकत्व
योग्य पोषण आणि उत्तम आरोग्य यासोबतच प्रेम, जवळीकता ही पण महत्वाची असते. पालक बालकाप्रती संवेदनशील असणे आणि त्यांनी बालकाच्या हालचाली, हावभाव, नजर व आवाजावरून बालकाची गरज ओळखणे, बालक काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे समजून घेऊन त्वरीत प्रतिसाद देणे म्हणजेच संवेदनशील पालकत्व होय. यामुळे बालक अधिक उत्साहाने नवीन गोष्टी शिकते व कुटुंबातील व्यक्तींसोबत त्याचे नाते अधिक प्रेमळ आणि घट्ट बनते.
सुरक्षित वातावरण
बालकाच्या योग्य विकासासाठी कौटुंबिक आणि भौतिक सुरक्षितता गरजेची असते. बालकाला भावनिक आघात तसेच भौतिक धोक्यांपासून सुरक्षित ठेवणे ही पालकांची जबाबदारी असते. बालकाला ओरडले, रागावले, शिक्षा केली तर बालकाच्या मनात असुरक्षितता निर्माण होते आणि त्याचा परिणाम आयुष्यभर राहतो. बालकाभोवती सुरक्षित आणि आनंदी वातावरण निर्माण करणे आवश्यक असते.
विकासाची संधी
गर्भधारणेपासूनच बालकाचा विकास सुरू होतो हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. सुरूवातीच्या वर्षांत बालक स्पर्श, संवाद आणि खेळ यातुन शिकत असते. बालकाला प्रेमाची ऊब हवी असते. निगा राखणारी व्यक्ती जेव्हा बालकाला जवळ घेते, हसते, मुका घेते किंवा गोंजारते तेव्हा बालकाला सुरक्षितता जाणवते. बालकाला कौतुक व प्रोत्साहनाची गरज असते. हसून, आवाजाची व हावभावाची नक्कल करून संवाद साधल्याने बालक हुशार होते. विविध खेळ खेळल्याने बालक अनेक कौशल्ये शिकते. बालकाला खेळ हवा असतो, खेळणी नाही.