सुरक्षित वातावरण
बालके जेंव्हा खेळतात व खेळातून नवनवीन कौशल्ये शिकत असतात तेंव्हा त्यांना कोणतीही शारीरिक आणि भावनिक इजा होऊ नये यासाठी सुरक्षित वातावरण देण्याची गरज असते. तसेच बालकांचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी सुद्धा बालकाभोवती सुरक्षित वातावरण तयार करणे गरजेचे असते. सुरक्षित वातावरणाचे मुख्यतः पुढील दोन गटात विभाजन करता येईल.
भौतिक वातावरण
- बालकांना सर्वसामान्यतः धोका अपघात झाल्यामुळे होतो. जसे भाजणे, कापणे, लागणे, पडणे, खुपणे, इत्यादी. अपघातामध्ये झालेल्या जखमा या मृत्यु होण्यासाठी विशेष कारणीभुत ठरतात आणि लहान बालके ही जास्तीत जास्त घरामध्ये किंवा घराजवळील आजूबाजुच्या परिसरामध्येच जखमी होतात.
- पालकांनी आणि इतर व्यक्तींनी सुरक्षेविषयी काळजीपुर्वक लक्ष दिले व बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केल्यास ब–याच गंभीर जखमांपासून बालकांचा बचाव करता येतो. रांगायला, चालायला आणि पळायला लागणा–या बालकांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
- बालकांना रस्त्याच्या कडेने किंवा रस्त्याच्या बाजूला जास्त धोका असतो. रस्ता ओलांडतांना किंवा रस्त्याच्या कडेने जाताना बालकांसोबत नेहमी मोठी व्यक्ती राहणे आवश्यक आहे.
- बऱ्याच वेळेला बालके कोणतीही वस्तू तोंडात टाकतात त्यामुळे होणारा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी बालकांची खेळणी स्वच्छ ठेवावीत.
पुढील बाबी बालकांसाठी धोकादायक ठरू शकतात...
साप, विंचू, इतर धोकादायक प्राणी
गळ्यात टाकता येणारी दोरी
विहिरी, नाल्या, घरामधील मोठमोठी छिद्रे
विष व अपायकारक वस्तु
गरम वस्तु
पाण्याची टाकी
धारदार वस्तु
विद्युत उपकरणे
अनोळखी व्यक्ती
कौटुंबिक वातावरण
- जसे बालकांना वस्तूंपासून शारीरिक इजा होऊ शकते त्याचप्रमाणे कुटुंबातील नकारात्मक व दुःखी वातावरणामुळेही बालकांना भावनिक असुरक्षितता जाणवते. भौतिक वातावरणासोबतच बालकांच्या विकासासाठी कौटुंबिक वातावरणही खूप महत्वाचे असते.
- बालकाला स्वत:चे मत असते याचा मोठ्यांनी आदर करावा.
- बालकांच्या भावनिक विकासासाठी घरातील व्यक्तींनी, नातेवाईकांनी व् आजुबाजूच्या लोकांनी काळजी घेणे फार गरजेचे आहे.
- बालकांचे हिंसा किंवा जोराने रागावणे यापासून रक्षण केले पाहिजे जेणेकरून बालकांचा आत्मविश्वास वाढेल व ते नवीन गोष्टी आत्मसात करून शिकतील.
- बालकांना नकोशा स्पर्शाबद्दल सांगता येण्याइतपत मोकळे वातावरण कुटुंबात असावे.
भावनिक सुरक्षितता
भौतिक आणि कौटुंबिक सुरक्षिततेसोबतच बालकांची भावनिक सुरक्षिततासुद्धा खूप महत्वाची असते.
बालकांना भावनिक सुरक्षितता वाटण्यासाठी प्रेमाने बोलणे, प्रेमाने स्पर्श करणे, गर्दीमध्ये किंवा अनोळख्या ठिकाणी सुरक्षित असल्याची जाणीव निर्माण करून देणे अत्यंत आवश्यक असते.
बालकाच्या आनंद आणि दु:ख या दोन्ही भावना समजून घेऊन त्याप्रमाणे बालकाशी मोकळा संवाद करावा. त्यामुळे आपल्या भावना समजून घेतल्या जातात याची जाणीव होऊन बालक स्वत:ला भावनिकरित्या सुरक्षित समजते.