संवेदनशील पालकत्व
पार्श्वभूमी
बालकाचे संगोपन करणे म्हणजे केवळ गरजा पूर्ण करणे नव्हे तर बालकाच्या प्रत्येक कृतीविषयी संवेदनशील असणे होय. योग्य पोषण आणि उत्तम आरोग्यासोबतच प्रेम, जवळीकता ही महत्वाची असते. बालकाच्या जीवनातील सुरूवातीचा काळ हा विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असतो. या काळामध्ये जर बालकाला प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, प्रोत्साहन, कौतुक मिळाले तर बालकाचा योग्य विकास होतो. त्याकरीता पालकांनी बालकाच्या गरजा ओळखणे हे खूप महत्वाचे असते. बालकाच्या अनेक गरजा असू शकतात, उदा. भूक लागणे, खेळणे, बोलणे, प्रेमाचा स्पर्श मिळणे, सु-शीची स्वच्छता, झोप, ओले कपडे बदलवणे इत्यादी. या गरजा बालकाच्या शारिरीक हालचाली किंवा कृतीवरून निगा राखणाऱ्या व्यक्तींनी संवेदनशीलपणे ओळखून, त्या क्रियेला शक्य तितक्या लवकर योग्य प्रतिसाद देऊन ती गरज पूर्ण करणे हेच संवेदनशील पालकत्व होय.
बालकाचे मन चंचल व जिज्ञासू असल्यामुळे ते कोणतीही एकच कृती दीर्घकाळ करू शकत नाही. वयानुसार बालकाच्या क्रिया बदलत जातात जसजसे बालक मोठे होते तसे ते वेगवेगळ्या कृती करायला शिकते. केलेल्या प्रत्येक कृतीतून बालक नवनवीन कौशल्ये शिकत असते व अनुभव ही घेत असते. यामुळे बालकाच्या कल्पनाशक्तीचा विकास होण्यास मदत होते. याकरिता पालकांनी बालकावर आपले मत न लादता बालकाच्या इच्छेनुसार कृती करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून बालक स्वतंत्रपणे विचार करून किंवा कल्पना करून नवीन कृती अस्तित्वात आणेल. याकरिता पालकांनी थोडा संयम ठेवून बालक करीत असलेल्या कृतीचे निरीक्षण करावे व गरज असल्यासच मदत करावी. कुटुंबातील एक सदस्य म्हणून बालकाला कौटुंबिक चर्चेमध्ये सहभागी केल्यास, त्याच्या आवड, निवड व मताचा आदर केल्यामुळे आपण स्वतंत्र व्यक्ती असल्याची भावना विकसित होण्यास मदत होते.
संवेदनशील पालक बनण्यासाठी...
संवेदनशील पालक गर्भधारणेपासूनच बालकाशी बोलतात, जन्मानंतर लगेच बोलण्यास प्रतिसाद देतात, स्मितहास्य करून, आवाजाची व हावभावाची नक्कल करून बालकाशी संवाद साधतात. पालकाने बालकाला वेळ देणे आवश्यक आहे. वेळ घालविणे म्हणजे सोबत खेळणे किंवा बोलणे एवढेच नव्हे तर बालकाच्या भावना ओळखून कृतीला प्रतिसाद देणे हे अधिक महत्वाचे आहे. पालकांनी जन्मापासून बालकाला कुशीत घ्यावे, कुरवाळावे, आणि त्याच्या प्रत्येक कृतीला प्रतिसाद द्यावा. कडेवर घेणे, मुका घेणे, गोंजारणे यासर्व क्रियामधून जो स्पर्श बालकाला होतो त्यातून बालकाला सुरक्षितता जाणवते व बालकाचा विकास चांगला होतो.
बालकाच्या क्रियांवर पालकाच्या प्रतिक्रियांचे चक्र
वरील आकृतीमध्ये बालक हालचाल किंवा कृतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या गरजा दर्शवीत असते. त्यावेळी पालक लवकरात लवकर प्रतिसाद देवून गरजा पूर्ण करतात व गरज वेळेत पूर्ण झाल्यामुळे बालक प्रतिक्रिया दर्शविते नंतर बालकाने दिलेल्या प्रतिक्रियेवर पालक प्रतिसाद देतात. अशा प्रकारची क्रिया बालक व पालक यांच्यात सतत चालू असते.
पालक किंवा निगा राखणारी व्यक्ती संवेदशील आहे का? हे पाहण्यासाठी स्वत:ला पुढील प्रश्न विचारावे.
वरील प्रश्नावर स्वत:चे काय उत्तर येत आहे याबाबत विचार करून निगा राखणाऱ्या व्यक्तीने संवेदशील बनण्यासाठी योग्य कृतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.
संवेदनशील पालकत्वाचे बालकावर होणारे सकारात्मक परिणाम
समाजात स्थिरता, समतोल व समता निर्माण करण्यासाठी आजपासूनच बालकाप्रती संवेदनशील होणे आवश्यक आहे. त्याकरिता या संकल्पनेचा अवलंब करून त्या अंमलात आणणे खूप महत्वाचे आहे.