पथदर्शी प्रकल्प

महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवाग्राम व जागतिक आरोग्य संघटना अंतर्गत बालसंगोपणाची माहिती पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी “बालकांच्या विकासासाठी निगा” हा प्रकल्प २०१० ते २०१४ या कालावधीत एकूण ६५ गावातील १०,०००० लोकसंख्येमध्ये राबविल्या गेला. हा प्रकल्प गावस्तरावर एकात्मिक बालविकास सेवा योजना व आरोग्य विभागाच्या समन्वयाने राबविण्यात आला.

या प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी व आशा कार्यकर्तींचे २ टप्प्यांमध्ये प्रत्येकी ३ – ३ दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच एक दिवसीय उजळणी प्रशिक्षण घेण्यात येऊन बालसंगोपनाची नवनवीन व शास्त्रीय माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या गेली. अंगणवाडी कार्यकर्ती व आशा कार्यकर्तीद्वारे गृहभेट, मातासभा, पालकत्व कार्यशाळा व विविध सामुदायिक कार्यक्रमांचा वापर करून बालसंगोपनाची (खेळ व संवाद, आहार, आरोग्य, संवेदनशील पालकत्व, सुरक्षित वातावरण) माहिती प्रत्येक पालकांपर्यंत पोहचविण्यात आली.

अंगणवाडी कार्यकर्ती व आशा कार्यकर्ती ह्या गृहभेट व मातासभेमध्ये वयानुसार खेळ व संवादाची कृती व माहिती देऊन त्याचे महत्व पटवून देत. तसेच पालकत्व कार्यशाळेच्या माध्यमातून गरोदर महिला व ० ते ३ वयोगटातील बालकांच्या पालकांना बालसंगोपनाची माहिती वेगवेगळ्या खेळाच्या कृतीद्वारे समजावून सांगत.

हा प्रकल्प राबविण्याच्या अगोदर व शेवटी सर्वेक्षण करून समुदायातील अगोदरची व प्रकल्प राबविल्यानंतरची बालसंगोपनाची स्थिती जाणून घेतली. सर्वेक्षणातील दिसलेले बदल जसे पालक बालक खेळ-संवादाच्या कृती वाढल्या, आहार देण्यामध्ये वाढ झाली, बालकांच्या वजनामध्ये वाढ दिसली, मातांचा मातासभेमध्ये सहभाग वाढला, वडिलांचा बालकांसोबत खेळाच्या कृती करण्यामध्ये वाढ झाली, तसेच बालकांसोबत खेळ संवादाच्या कृती केल्यामुळे मातांच्या मानसिक स्थितीमध्ये झालेले बदल निरीक्षणाद्वारे जाणून घेतले. ह्या सर्व घटकांचा बालसंगोपनात सकारात्मक परिणाम दिसून आला.

हाच प्रकल्प ० ते ३ वयोगटासाठी युनिसेफ अंतर्गत प्रायोगिक तत्वावर २०१८ ते २०२१ दरम्यान महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये चार तर यवतमाळमध्ये सहा तालुक्यांत राबविण्यात आला. या प्रकल्पातर्गत निवडलेल्या तालुक्यातील ICDS विभागातील अंगणवाडी पर्यवेक्षिका व आरोग्य विभागातील तालुका समूह संघटक व आशा गटप्रवर्तक यांना एकूण पाच टप्प्यामध्ये प्रत्येकी पाच दिवसाचे प्रशिक्षण दिल्या गेले व त्यांच्याद्वारे अंगणवाडी कार्यकर्ती व आशा कार्यकर्तींना महिन्यातून एकदा असे १२ महिण्यात प्रशिक्षण दिल्या गेले. यामध्ये मुख्यतः गृहभेट, पालकसभा, पालक मेळावा व समुदाय आधारित विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बालसंगोपनाची माहिती पालक तसेच कुटुंबापर्यंत पोहचविल्या गेली. तसेच तालुकास्तरावर कार्यरत इतर विभाग जसे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM), पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातूनही बालसंगोपनाची माहिती पालकांपर्यंत पोहोचविल्या गेली. या प्रकल्पाच्या सुरूवातीला व शेवटी सर्वेक्षण करण्यात आले. या प्रकल्पामुळे अनेक सकारात्मक बदल दिसून आले जसे की बालसंगोपन करताना कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण झाले, वडील पालकांचा सहभाग वाढला, आहार व विकासात्मक निष्कर्षही सुधारलेले दिसून आले, बालकातील कुपोषणाचे (बुटकेपणा व लूकडेपणाचे) प्रमाणसुद्धा कमी झालेले आढळून आले.

२०२१ पासून ई. सी. डी. हा प्रकल्प “आरंभ”, ह्या नविन नावाने विस्तारित स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रात महिला व बालविकास विभाग व आरोग्य विभागाद्वारे राबविण्यात येत आहे. याकरिता दोन्ही विभागातून निवडक अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच तालुका समूह संघटक .व आशा गटप्रवर्तक यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करून त्यांना आरंभचे प्रशिक्षण दिल्या जाते. हे मुख्य प्रशिक्षक त्यांच्या जिल्ह्यातील इतर अंगणवाडी पर्यवेक्षिका व आशा गटप्रवर्तक यांना प्रशिक्षण देतात. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षक त्यांच्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी कार्यकर्ती व आशा कार्यकर्तींना प्रशिक्षण देतात. ही सर्व बालसंगोपनाची माहिती अंगणवाडी कार्यकर्ती व आशा कार्यकर्ती वेगवेगळ्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचवितात.