बालसंगोपनाचा "आरंभ"
कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ५ वर्षाखालील ४३% बालकांना बुटकेपणा आणि योग्य विकासाची पातळी गाठू न शकण्याचा धोका आहे. तसेच भारतही अतितीव्र कुपोषणाच्या समस्येला तोंड देत आहे. ५ वर्षाखालील ३८% बालके बुटकी आहेत. निकृष्ट आरोग्य, अपुरे पोषण, ताणतणाव आणि वयोगटानुसार कमी प्रमाणात मिळणारे प्रोत्साहन यामुळे लाखो बालके त्यांना हवे तसे यश संपादन करण्यात तसेच भावी आयुष्यात त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरतात. महाराष्ट्र हे लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असुन २०१९ मध्ये निती आयोगाने जाहीर केलेल्या आरोग्याच्या निर्देशांकानुसार देशातील आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य म्हणून देखील एक आहे. महाराष्ट्राने पाच वर्षाखालील मृत्यु दर कमी करण्याचे शाश्वत विकासाचे ध्येय जरी गाठले आहे तरी राज्यात अद्याप कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे आणि जवळजवळ एक तृतीयांश बालके दीर्घकालीन कुपोषीत म्हणजे बुटकी (stunted) आणि प्रत्येक चौथे बालक लुकडे (wasted) आहे.
बालसंगोपनाच्या धोरणानुसार (nurturing care framework) जागतिक आरोग्य संघटना, यूनिसेफ आणि जागतिक बँक बालकांचा मृत्युदर कमी करण्यासाठी, तसेच आरोग्य आणि मानवी संभाव्य क्षमतेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतात. इतर कोणत्याही कालावधीपेक्षा गर्भधारणेपासून ते सुरूवातीच्या ३ वर्षापर्यंत मेंदुची वाढ अगदी झपाट्याने होत असते आणि हे बालविकासाचे धोरण (nurturing care framework) सुरूवातीच्या वर्षाचे व मेंदूच्या वाढीचे महत्त्व अधोरेखीत करते.
उपलब्ध पुरावे सिद्ध करतात की, वयानुसार विकासाचा वेग कमी असलेल्या बालकांना योग्य वेळेत प्रोत्साहन मिळाले तर ते सुद्धा सर्वसाधारण बालकांच्या विकासाचा स्तर सहज गाठू शकतात. त्यामुळे बालकांसाठी लवकर विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर बालकाचे नुकसान कमी होऊन बालकांना त्यांच्या जास्तीत जास्त संभाव्य क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत होते. बालविकासात गुंतवणूक करणे म्हणजे समृद्धीकडे वाटचाल करण्याचा, आर्थिक वाढीस चालना देण्याचा आणि असमानतेचे चक्र तोडण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. संवेदनशील पालकत्व, आहार व पोषण, विकासाची संधी, स्वच्छता व आरोग्य व सुरक्षित वातावरण हे बालसंगोपनाचे पाच घटक आहेत. भारतात बालसंगोपनाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी एकात्मीक बालविकास सेवा योजना आणि राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. या संधींचा वापर करून ० ते ३ वर्ष वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास, योग्य पोषण व चांगले आरोग्य याकडे लक्ष देण्याच्या पद्धतीत सुधारणा करणे हे प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
'आरंभ'चा प्रवास
- भारतातील बालसंगोपनासाठी उपलब्ध असलेल्या संधींचा आराखडा तयार.
- कुटुंब आणि समुदाय यांना सक्षम करण्यासाठी मुख्य आणि पूरक माध्यमांचा वापर कसा करावा हे ठरविले.
- जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्र बालनिधीद्वारे तयार केलेल्या केअर फॉर चाइल्ड डेवलपमेंट (सी. सी. डी.) पॅकेजचा आधार घेऊन त्याला भारतात राबवण्यायोग्य पॅकेजमध्ये विकसित केले.
- पथदर्शी प्रकल्प टप्पा १: सहा महिने, १० गावं, १०,००० लोकसंख्या.
- अंगणवाडी ताई व आशांची क्षमताबांधणी करून त्यांचा सहभाग.
- विकसित केलेल्या पॅकेजला अंतिम स्वरूप.
- पॅकेजची व्यवहार्यता आणि परीणामकारकता तपासली.
- पथदर्शी प्रकल्प टप्पा २: दोन वर्ष, ६५ गावं, १,००,००० लोकसंख्या.
- विकसित केलेल्या पॅकेजमध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना व आरोग्य विभागात उपलब्ध संधीचा समावेश आणि अंमलबजावणी.
अंमलबजावणीचे निष्कर्ष आणि आलेल्या अनुभवांचा प्रसार व प्रचार.
- दोन जिल्ह्यांतील १० प्रकल्प, १.२ दशलक्ष लोकसंख्या.
- एकात्मिक बालविकास सेवा योजना, आरोग्य व इतर विभागातील उपलब्ध संधीचा उपयोग करून पोषण व बालसंगोपनासाठी कार्यप्रणाली विकसित करून अंमलबजावणी केली.
- टप्पानिहाय प्रशिक्षण पद्धतीचा अवलंब व पर्यवेक्षिकांची क्षमता बांधणी.
- तटस्थ संस्थेकडून मूल्यांकन.
आरंभ उपक्रम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा निर्णय.
कोरोंना महामारी दरम्यान कुटुंब आणि समुदायाला सक्षम करण्यासाठी पर्यायी माध्यमांचे बळकटीकरण (सोशल मीडिया).
- राज्यस्तरावर अंमलबजावणीची सुरवात.
- एकात्मिक बालविकास सेवा योजना व आरोग्य विभागातील प्रमुख प्रशिक्षकांचा गट तयार.