आहार व पोषण

पार्श्वभूमी

अन्न ही मानवाची प्राथमिक गरज आहे, त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषणदृष्ट्या समतोल हवे. शरीरपोषण व संवर्धन यासाठी कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, पाणी, क्षार, जीवनसत्व व खनिज द्रव्ये यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे. कोणत्याही एकाच खाद्यपदार्थात हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणे शक्य नसल्याने या सर्व घटकांचे सुयोग्य प्रमाण रोजच्या आहारात विविध पदार्थ समाविष्ट करुन साधले पाहिजे.
पोटभर जेवणे म्हणजे पोषण होणे असा अर्थ नसून क्षार, जीवनसत्व इत्यादींसारखे पोषक घटक मिळणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. जेवणामध्ये त्या त्या भागात पिकवली जाणारी स्थानिक अन्नधान्ये, फळे आणि भाज्यांचा समावेश करणे अतिशय महत्त्वाचे आहे. बालकांचे पोषण चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्यांच्या मातांनाही योग्य प्रकारचा आहार मिळणे आवश्यक आहे. बालकाची वाढ आणि विकास सर्वसामान्य तऱ्हेने होण्यासाठी सुयोग्य पोषण आवश्यक असते.

Play Video

अतिशय महत्वाचे

समतोल आहारातील मुख्य अन्नघटक खालील प्रमाणे आहेत. याचा बालकाच्या आहारामध्ये नियमित समावेश करावा.

कडधान्ये, डाळी, तेलबिया आणि सुकामेवा

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

तृणधान्य

अंडी

रताळे आणि बटाटे

इतर भाज्या आणि फळे

पिवळ्या रंगाची फळे आणि भाज्या

मांसाहारी पदार्थ

आहारामध्ये ऊर्जावर्धक, शरीराची झीज भरुन काढणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीर निरोगी ठेवणारे, अशा तिन्ही प्रमुख अन्नघटकांचा समावेश असावा.​

शरीराला कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थापासून ऊर्जा मिळते, सर्व प्रकारची तृणधान्य आणि कंदमुळांपासुन कर्बोदके मिळतात. सर्व प्रकारचे तेल, तेलबिया आणि तूप यापासून स्निग्धपदार्थ मिळतात.

प्रथिंनांमुळे शरीराची झीज भरून निघते. सर्व कडधान्य, मोड आलेले धान्य, तेलबिया, दूध व दूधाचे पदार्थ आणि अंडी, मांस, मासे, यापासून प्रथिने मिळतात.

जीवनसत्वे व खनिजद्रव्यापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीराचे संरक्षण होते. सर्व फळे, पालेभाज्या आणि फळभाज्या यापासून जीवनसत्वे व खनिजद्रव्य मिळतात.

भूक लागल्याची लक्षणे (0 ते ६ महिने)

बालकाने हात चोखणे
हातापायाची हालचाल तीव्र करणे
तोंडातुन लाळ गाळणे
नजर इकडे तिकडे वळवुन आईला शोधण्याचा प्रयत्न करणे
आपले डोके स्तनाकडे वळवुन किंवा गडबड करून स्तनपानाची आवड दर्शवणे
सर्वात शेवटी रडणे

भूक लागल्याची लक्षणे (६ ते १२ महिने)

आईच्या मागे फिरणे
आईचा पदर ओढणे
स्वयंपाक घरात किंवा त्याच्या खाऊच्या डब्याजवळ घेवून जाणे
रडणे

भूक संपल्याची लक्षणे

तोंड फिरवणे किंवा बंद करणे
लांब जाणे
खाण्यास नकार देणे
अन्न बाहेर काढणे

वयानुसार पूरक आहार

बालकाला खाऊ घालताना...

गाणे, गोष्टी, निसर्गरम्य वातावरण या माध्यमांचा वापर करावा.

स्पर्श करणे, बोलणे आणि संवाद साधणे खूप आवश्यक असते.

स्वतःच्या हाताने खाण्यास प्रोत्साहन दयावे.

कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश असावा.

खाऊ घालणाऱ्या व्यक्तीचे पूर्ण लक्ष बालकाकडे असावे.

स्वतंत्र ताटात आहार द्यावा.

जबरदस्तीने खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नये.

माहिती पत्रके