निरीक्षण आणि मुल्यमापन
उपक्रम यशस्वी करण्यासाठी निरीक्षण आणि मुल्यमापन करणे खूप आवश्यक आहे. या आधारावर उपक्रमाची स्थिती जाणून घेऊन वेळेनुसार योग्य बदल करता येतात.
पथदर्शी प्रकल्पामध्ये
औरंगाबाद आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि आशा गटप्रवर्तक, तालुका समूह संघटक यांना ई. सी. डी. टीममार्फत बालसंगोपनाचे प्रशिक्षण दिले जात. पुढे हे सर्वजण आपआपल्या कार्यक्षेत्रात प्रशिक्षण देत. या प्रशिक्षणाचे निरीक्षण व सकारात्मक पर्यवेक्षण करण्यासाठी ई. सी. डी. चे तालुका समन्वयक उपस्थित राहत. बीट स्तरावर होणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्त्या व आशा कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची स्थिति जाणण्यासाठी तालुका समन्वयक प्रशिक्षणाची माहिती गुगल फॉर्मद्वारे मध्यवर्ती कार्यालयास जमा करत.
तालुका समन्वयक बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांच्यासोबत मासिक बैठका घेत. या बैठकांमध्ये गृहभेट, पालकसभा, पालक मेळावा तसेच बीट स्तरावरील प्रशिक्षणांबाबत सविस्तर चर्चा करून सद्य स्थितीचा आढावा व आकडेवारी घेतली जात. यासाठी निरीक्षण सूचीचा वापर करत. अशाच पद्धतीने आरोग्य विभागासोबतसुद्धा मासिक बैठका घेतल्या जात.
विस्तारीत "आरंभ" उपक्रमामध्ये
- महाराष्ट्र स्तरावर उपक्रम राबवित असताना जिल्हास्तरीय “आरंभ” प्रशिक्षणाचा गुगल फॉर्म भरल्या जातो. त्यात उपस्थित प्रशिक्षणार्थींची संख्या, प्रशिक्षकाचा सहभाग, विषयाची मांडणी, इ. बाबत सविस्तर माहिती भरली जाते.
- पालकांकडून करण्यात येणाऱ्या कृतीविषयी जाणून घेण्यासाठी "तरंग सुपोषित महाराष्ट्राचा" या उपक्रमाअंतर्गत माहिती जमा करण्यात येते.
- अंगणवाडी कार्यकर्त्यांचे बीटस्तरावरचे प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रशिक्षण देणाऱ्या पर्यवेक्षिका प्रशिक्षणाची स्थिती कशी होती हे गुगल फॉर्म भरून सांगतात.
- बीटस्तरावरच्या प्रशिक्षणाची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी बालविकास अधिकारी यांच्या सोबत चर्चा करण्यात येते.
- पर्यवेक्षिकेने दिलेले बीट स्तरावरील प्रशिक्षण योग्य पद्धतीने होत आहे का, हे प्रत्यक्ष फोन कॉल व झूम मिटिंगद्वारे समजून घेतल्या जाते.
सकारात्मक पर्यवेक्षण
- सकारात्मक पर्यवेक्षण हे एक अत्यंत महत्वाचे कौशल्य आहे. सकारात्मक पर्यवेक्षणामुळे दोन व्यक्तींमध्ये विश्वासाचे आणि मैत्रीपूर्ण नाते निर्माण होते. प्रत्येक क्षेत्रभेटीदरम्यान कार्यक्षेत्रामध्ये राबवण्यात येणाऱ्या मुख्य कृती जसे गृहभेट, पालकसभा, पालक मेळावा तसेच सामुदायीक कार्यक्रम यांचे सुक्ष्म निरीक्षण करून त्याचे सकारात्मक पर्यवेक्षण करणे प्रत्येक पर्यवेक्षकाकडून अपेक्षीत आहे. सकारात्मक पर्यवेक्षण करताना, बनवण्यात आलेल्या निरीक्षण सूचीचा वापर केला जातो. निरीक्षण सूचीमधील सर्व मुद्द्यांचे पर्यवेक्षकेद्वारे सुक्ष्म निरीक्षण केल्या जाते.
- सकारात्मक पर्यवेक्षण करताना पर्यवेक्षिका अगोदर अंगणवाडी किंवा आशा कार्यकर्त्यांना त्यांनी केलेल्या कृतीबाबत त्यांचे स्वतःचे मत विचारतात. त्यानंतर निरीक्षण सूचीतील प्रश्नावलीप्रमाणे चांगल्या झालेल्या कृतीसाठी कौतुक करतात. निरीक्षण सूचीतील ज्या गोष्टी सुटल्या असतील त्याविषयी न रागावता शांतपणे सकारात्मक शब्दात मार्गदर्शन करतात आणि पुढच्या भेटीच्या वेळेला सूचीप्रमाणे सर्व मुद्दे लक्षात घेण्यासाठी प्रोत्साहन देतात.
- अशा प्रकारे सकारात्मक पर्यवेक्षणाचा वापर केल्यास कामामध्ये हवे असलेले बदल योग्य रितीने होण्यास मदत होते.
स्वयंमुल्यांकन
अंगणवाडी / आशा कार्यकर्त्या
स्वत:च स्वत:चे मुल्यांकन करावे यासाठी स्वयंमुल्यांकन सुची तयार करण्यात आली. यामध्ये पालकसभा घेताना, गृहभेट देतांना सुचीतील सर्व मुद्द्यांचा उपयोग करण्यात आला का? असे प्रश्न अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या स्वत:लाच करतात त्या आधारावर पुढील पालकसभा / गृहभेटीदरम्यान कशी सुधारणा करता येईल यावर स्वत:च विचार करतात.
पर्यवेक्षिका
प्रशिक्षण दिल्यानंतर तयार असलेल्या सुचीचा उपयोग करून पर्यवेक्षिका स्वत:चे मुल्यांकन स्वत:च करतात व त्या आधारावर काय सुधारणा पुढील प्रशिक्षणादरम्यान केली जाणे अपेक्षित आहे याबाबत स्वत:च विचार करतात.
सर्वेक्षण पद्धती
प्रकल्प सुरू होण्यापुर्वीचे सर्वेक्षण
उपक्रम सुरू होण्याच्या आधी बालससंगोपणबाबत काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले गेले. यामध्ये गुणात्मक आणि परिणामात्मक अशा दोन प्रकारे विश्लेषण केले.
अंमलबजावणी दरम्यानचे सर्वेक्षण
प्रकल्पाच्या अंमलबजावणीला १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर समुदायामध्ये काय बदल झाला हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले.