विकासाची संधी
पार्श्वभूमी
- गर्भधारणेपासूनच बालकाचा विकास होत असतो.
- निगा राखणाऱ्या व्यक्तीने जर लवकरात लवकर बालकासोबत मेंदूला चालना देणाऱ्या कृती केल्या तर बालकाला नवीन अनुभव मिळण्याची संधी उपलब्ध होईल आणि या सर्व अनुभवामुळे बालकाच्या मेंदूच्या विकासाला चालना मिळेल.
- सुरूवातीच्या तीन वर्षात मेंदूची वाढ ही खुप झपाट्याने होत असते, त्याच वेळी आपल्याला बालकाला योग्य चालना किंवा प्रोत्साहन द्यायची सर्वात जास्त गरज असते.
- जन्मतः प्रत्येक बालकाची वाढ व विकासाची क्षमता ही वेगवेगळी असते व ही क्षमता वाढावी याकरीता पालकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असतो.
- सुरूवातीच्या काळात बालकाची निगा कशी घेतली गेली याचाही परिणाम बालकाच्या वाढ व विकासावर होत असतो. निगा राखणा-या व्यक्तीकडून मिळालेल्या पहिल्या काही वर्षातील अनुभवाचा परिणाम बालक कशा प्रकारची चांगली व्यक्ती होईल यावर होत असतो.
- बालकाच्या विकासासाठी कुटुंबाकडून प्रेम व आपुलकी मिळणे अत्यंत महत्वाचे असते. त्यामुळे बालकाच्या वाढ व विकासात भर पडते व बालक सुदृढ राहते.
- बालक अगदी कमी वयातच पुढील आयुष्यात आवश्यक अशी कौशल्ये आत्मसात करते.
- बालकाच्या मेंदूची वाढ जन्माच्या आधी आणि जन्मानंतर तीन वर्षात झपाट्याने होत असते. बालक जन्मल्याबरोबरच पाहू व ऐकू शकते.
- बालकाला अगदी लहान असल्यापासून डोळ्यांचा व कानाचा उपयोग करण्याच्या संधीची गरज असते. मेंदूच्या विकासासाठी बालकाला हालचाल तसेच स्पर्श करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तु खेळणी म्हणून इतरांसोबत खेळण्याची आवश्यकता असते.
- ‘खेळ आणि संवाद कृती’ बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्वाच्या असतात.
- घरगुती साहित्याचा ‘खेळ आणि संवाद कृती’ साठी जास्तीत जास्त उपयोग करावा.
- कुटुंबातील सर्व सदस्यांचा बालकाशी ‘खेळ आणि संवाद कृती’ करण्यामध्ये समावेश असावा.
बालकांचे संगोपन आणि शिक्षण हा पूर्वीपासूनच प्रत्येक मानवी समाजाचा महत्वाचा हिस्सा राहिलेला आहे. पालकांकडे बालकांचे पहिले शिक्षक म्हणुन पाहिले जाते व बालकांच्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये ते एक अविभाज्य घटक असतात. ०-३ या काळात झालेल्या संगोपनाचा प्रभाव भविष्यातील शिक्षणावर पडू शकतो. पालकांशी त्यांचे संबंध दृढ राहिले तर त्यांचे जग विस्तारून ते भोवतालच्या परिस्थितीशी लवकर जुळवुन घेऊ शकतात.
जे पालक सातत्याने आपल्या बालकांशी संवाद साधतात, त्यांना प्रतिसाद देतात ती बालके लवकर शिकतात. खेळ व कृतीच्या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास होतो. खेळाच्या माध्यमातून बालके त्यांच्या आवडीचे विषय लवकर शिकतात. या काळात बालकांना स्वातंत्र्य व प्रोत्साहनाची गरज असते. बालकांना या वयात योग्य संधी उपलब्ध करून द्यावी व कौतुक करावे, जेणेकरून बालके त्यांच्या क्षमतेनुसार विकासाची उच्चतम पातळी गाठू शकतील. तसेच त्यांची जिज्ञासा, एकाग्रता, स्मरणशक्ती आणि इतर कौशल्य सुद्धा अधिक झपाट्याने विकसित होतात.
संशोधनात असे दिसून आले आहे की नवजात बालकाचा मेंदू प्रत्येक सेकंदाला ७०० ते ८०० सिनॅप्स (चेतापेशी) विकसित करतो. जितके जास्त सिनॅप्स तयार होतात तितकेच बालक हुशार बनते.
स्पर्श
अगदी जन्मापासूनच बालकाला आपल्याशी कुणीतरी बोलावे, आपल्याला कुशीत घ्यावे, कुरवाळावे आणि सर्वांनी आपल्याला प्रतिसाद द्यावा असे वाटते. या बालकाच्या अत्याधिक महत्वाच्या गरजा असतात. निगा राखणारी व्यक्ती जेव्हा बालकाला जवळ घेते, कडेवर घेते, हसते, मुका घेते, गोंजारते यासर्व क्रियांमधून जो स्पर्श बालकाला होतो त्यामुळे बालकाला सुरक्षितता जाणवते व बालकाचा विकास चांगला होतो.
संवाद
गर्भधारणेपासूनच बालकाशी बोलण्यास सुरूवात केली पाहिजे, जन्मानंतर बोलण्यास प्रतिसाद दिला पाहिजे. स्मितहास्य करून, आवाजाची व हावभावाची नक्कल करून बालकाशी संवाद साधावा. लहान बालकांना सतत कौतुक व प्रोत्साहनाची गरज असते.
खेळ
बालकाच्या विकासात खेळाचे स्थान महत्वाचे आहे. खेळल्याने बालकाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. निगा राखणारी व्यक्ती वेगवेगळ्या घरगुती वस्तूंचा वापर करून बालकाचे अनेक कौशल्ये विकसीत करण्यास मदत करू शकते.
खेळ व संवाद कृती
प्रेमळ स्पर्श, संवाद आणि खेळ बालविकासासाठी महत्वाचे ठरते. बालकांशी खेळणे त्यांच्या सर्वांगीण विकासास चालना देते आणि पालकांशी असलेले नातेही घट्ट बनवते. आपल्या बालकासोबत त्याच्या वय व क्षमतेनुसार खेळ खेळणे व संवाद साधने ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे.