माध्यमे
आरंभ उपक्रमा अंतर्गत बालसंगोपनाची माहिती पालकांपर्यंत तसेच कुटुंबापर्यंत पोहचविण्यासाठी खालील माध्यमांचा प्रभावीपणे वापर करण्यात आला.
गृहभेट
प्रत्यक्ष कुटुंबापर्यंत माहिती पोहचविण्यासाठी गृहभेट हे एक प्रभावी माध्यम आहे. परंतु अंगणवाडी कार्यकर्ती व आशा ताईंच्या मार्फत होणारी गृहभेट ही सुरुवातीला एकतर्फी असायची. त्या स्वत:जवळ असलेली माहिती मातांपर्यंत पोहचवायची हा एवढाच उद्देश ठेवून मातांपर्यंत पोहचत होत्या. त्यांची स्थिर अशी पद्धत नव्हती. आरंभ उपक्रमांतर्गत गृहभेट या माध्यमाचा प्रभावीपणे वापर करता येईल या दृष्टिकोनातून विचार करुन त्याप्रमाणे गृहभेटीची नव्याने मांडणी करण्यात आली. आता आरंभ प्रकल्पांतर्गत अंगणवाडी व आशा कार्यकर्ती ह्या दोघी मिळून अगोदर गृहभेटीचे पूर्वनियोजन करतात. त्यात बालकांच्या नावाची यादी, वयानुसार खेळासाठी साहित्य, माता व बाल संगोपण पत्रिका, खेळ व संवाद कृतिसूची या सर्वांचा त्यात समावेश असतो. गृहभेट देत असलेल्या कुटुंबाला गृहभेटीला येत असल्याची पूर्वकल्पना देऊन त्यांचा वेळ घेतल्या जातो. माहिती सांगताना कुटुंबामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या सदस्यांना सहभागी केल्या जाते. अगोदर त्यांच्याकडून बालक करीत असलेल्या कृतीची माहिती जाणून घेऊन कुटुंबातील सदस्यांना बालकासोबत वयोगटानुसार घरगुती साहित्याचा उपयोग करून खेळाच्या कृतीचे प्रात्यक्षिक करून घेऊन त्या कृतीतून बालकाचा सर्वांगीण विकास कसा होतो, हे खेळ संवाद कृतिसूची, माता व बाल संरक्षण पत्रिकेमधून समजावून सांगतात. तसेच गरजेनुसार आवश्यक व नवीन माहिती दिल्या जाते. त्यांच्यातील होणारा संवाद हा दुतर्फी आणि चर्चेच्या स्वरूपात असतो.
पालकसभा
समूहाच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक मातापर्यंत पोहचण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे मातासभा. सुरुवातीला अंगणवाडी कार्यकर्ती मातासभा घेतांना सगळ्या वयोगटातील बालकांच्या मातांना एकत्रित बोलावून त्यांच्याकडे बालविकासाची असलेली सगळी माहिती एकाचवेळी मातांना सांगत होत्या. प्रत्येक वेळी दिली जाणारी माहिती ही एकसारखी असायची आणि त्यामध्येही एकतर्फी संवाद असून केवळ मातांचाच सहभाग असायचा.
आरंभ उपक्रमांतर्गत बालसंगोपणाची माहिती सर्व पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी अगोदरपासून होत असलेल्या मातासभा या माध्यमाचा प्रभावीपणे उपयोग केल्या गेला. बालसंगोपणात केवळ आईच नाही तर वडीलांची भूमिका ही महत्त्वाची असते. म्हणून सभेला केवळ मातांनाच न बोलविता वडीलांनाही बोलविले जाऊ लागले म्हणून या सभेला पालकसभा म्हणून संबोधल्या गेले. सर्व बालकांच्या पालकांना एकाचवेळी सभेला न बोलविता बालकांच्या वयोगटानुसार चार गट तयार करून प्रत्येक गटाची आठवड्यातून एकदा यानुसार सभा घेतल्या जाते. ज्या गटातील पालकांची सभा असेल त्या सर्व पालकांना बालकांसोबत पालकसभेला येण्याची पूर्वकल्पना दिली जाते. तसेच किशोरी मुलींनाही या सभेला बोलविले जाते. गरज असल्यास किशोरी मुलींचा वेगळा गट करून महिन्यातून एकदा त्यांची सभा घेतली जाते.
यामध्ये पालकांना एकसारखी माहिती न देता आवश्यकता व वयोगटानुसार माहिती दिली जाते. पालकसभेची सगळी तयारी अंगणवाडी व आशा कार्यकर्ती मिळून करतात. जसे पालकसभेचे नियोजन, गटाची निवड, दिनांक, वेळ, खेळाची निवड, सगळ्या बालकांसाठी खेळणी, समुपदेशन पत्रिका, इत्यादी. सभेदरम्यान सर्व पालकांना खेळणी देऊन बालकांसोबत खेळायला सांगितले जाते. त्यांच्या खेळाच्या कृतीचे निरीक्षण करून त्या खेळातून बालकांचा विकास समजावून सांगितला जातो. त्याचसोबत आहार, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित वातावरण याबाबतही गरजेनुसार माहिती त्यांना चर्चेद्वारे दिली जाते. सोबतच पालक बालकांसोबत घरी करीत असलेल्या चांगल्या कृतींना प्रोत्साहित करून त्यांना बालसंगोपणात येत असलेल्या अडचणी यावरसुद्धा चर्चा केली जाते. यानंतर पुढील महिन्यातील पालकसभेला येण्याची वेळ व तारीख ठरवून सर्वांचे आभार व्यक्त करून पालक सभेची सांगता केली जाते.
पालकसभांचे गट
पहिला आठवडा
दुसरा आठवडा
तिसरा आठवडा
चौथा आठवडा
पाचवा आठवडा
पालक मेळावा
‘पालक मेळावा’ हे असे प्रभावी माध्यम आहे ज्याआधारे आपण समुदायातील प्रत्येक घटकांपर्यंत बालविकासाचे महत्व आणि संदेश पोहचवू शकतो. सामाजिक मान्यता, रूढी सकारात्मकपणे बदलविण्यासाठी तसेच बालविकासाला अधिक पोषक वातावरण तयार करण्यासाठी ‘पालक मेळावा’ हे अतिमहत्वाचे आणि प्रभावी माध्यम आहे.
पालक मेळावा या माध्यमाद्वारे समाजातील सर्व महत्वाचे भागीदार जसे की एकात्मिक बालविकास सेवा योजना, आरोग्य विभाग, पंचायत समिती, शिक्षण विभाग, आणि इतर विभाग एकत्र येऊन बालविकासाविषयी योगदान देण्यासाठी योजना आखून त्याप्रमाणे कृती करू शकतात. त्यामुळे सकारात्मक सामाजिक बदल घडवणे सहज शक्य होईल आणि समुदायातील प्रत्येक बालक क्षमतेनुसार विकासाची ऊंची गाठू शकेल. हा उद्देश पूर्ण करायला पालक मेळावे अत्यंत प्रभावी सिद्ध झालेले आहेत. पालक मेळावा दोन प्रकारामध्ये घेणे शक्य आहे.
छोटा पालक मेळावा
अशा प्रकारचा पालक मेळावा गावस्तरावर एका गावातील किंवा चार ते पाच छोटे गावं मिळून त्या गावात असणार्या अंगणवाडी कार्यकर्ती व आशा कार्यकर्ती, त्या गावातील युवक/युवती आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका, आशा गटप्रवर्तक मिळून लहान स्तरावरील पालक मेळावा घेवून बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचे सक्षमीकरण करू शकतात.
मोठा पालक मेळावा
अशा प्रकारचा पालक मेळावा तालुका स्तरावर किंवा क्षेत्र (बीट) स्तरावर सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या व आशा कार्यकर्त्या, आजुबाजूच्या गावातील युवक/युवती आणि सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, आशा गटप्रवर्तक यांच्या मदतीने पालक मेळावा घेवून बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचे सक्षमीकरण करू शकतात.
समुदायातील इतर कार्यक्रम
अन्न प्राशन दिवस
बालकाला ६ महिने पूर्ण झाल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना बालकाला घेऊन अंगणवाडी केंद्रामध्ये एकत्र बोलविल्या जाते. बालकाला सहा महिन्यानंतर अन्न सुरू करण्याचे महत्व, अन्न पदार्थात कोणते घटक असावे, जेवण कसे भरवावे, या सर्वात कुटुंबातील व्यक्तीची काय भूमिका आहे याबाबत सविस्तर चर्चा केली जाते. त्याचबरोबर बालकाला कसे खाऊ घालावे हे प्रत्यक्ष कृतीद्वारे समजावून सांगितल्या जाते.
नवीन नोंदणी (गरोदर माता)
नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना भेट देताना सांगितल्या जाते की मासिक पाळी चुकल्यानंतर लवकरात लवकर अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी करावी. त्यानुसार नवीन नोंदणी झालेल्या मातांना ठरविलेल्या दिवशी बोलावून अशा स्थितीत कशी काळजी घ्यायला पाहिजे, स्वत: चे आरोग्य आनंदी ठेवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर बाळ पोटात असल्यापासूनच त्याचा विकास कसा होतो, यासाठी कुटुंबातील सर्वांनी काय करणे अपेक्षित आहे याबाबत सांगितल्या जाते.
ओटीभरण
गर्भवती मातांना आहार व आरोग्याविषयी मार्गदर्शन केले जाते. या माध्यमाद्वारे बालसंगोपणाची माहिती (संवेदनशील पालकत्व, खेळ संवाद कृती, प्रतिसदात्मक आहार, आरोग्य, सुरक्षित वातावरण) प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचविल्या जाते.